पाथरूड या आपल्या गावाचा तुम्हाला अभिमान वाटतो ना? तुम्हाला पाथरुडचा इतिहास माहीत आहे? मग गावचा इतिहास जाणून घेण्यासाठी खलील संपूर्ण लेख शेवट पर्यंत वाचा
पाथरूड भूम तालुक्यातील महत्वाचे गाव आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात पेढा निर्मिती आणि व्यवसाय करणारे गाव.पेढ्याच्या व्यवसायामुळे महाराष्ट्र , मध्य भारत आणि दक्षिण भारतात व्यावसायिक संबंध असलेले बहुधा देशातील एकमेव गाव.सोलापूर - शिर्डी महामार्गावर वसलेले पाथरूड हे गाव स्वयंपूर्ण खेडे आहे , या गावाच्या प्राचीन काळाची साक्ष देणारे येथील हेमाडपंथी महादेव मंदिर , अष्टविनायका प्रमाणे मोठ्या आकाराच्या गणपतीचे मंदिर अनेक आख्यायिका असलेले जागृत हनुमान मंदिर , अलीकडच्या काळात विकसित झालेले वैद्यनाथ म्हणजे वैजुबा मंदिर व तेथील नाथपंथीय स्थान . तेरा खेडे व चौदावे पाथरूड आठवडी बाजाराचे स्वयंपूर्ण गाव म्हणजे पाथरूड .पूर्वीच्या काळी ब्रिटिश आणि हैद्राबाद संस्थानच्या सीमेवरील महत्वाचे गाव. पाथरुडच्या शिवे शेजारी ईट रोडवरील कालावंतिणीचा महाल नावाची प्राचीन वास्तू ऐतिहासिक गूढ आहे आणि त्याचा नक्कीच पाथरूडच्या इतिहासाशी संबंध असावा . सर्वप्रथम आपण पाथरूड या गावाच्या नावाच्या संबंधात विचार करू , तेर - तुळजापूर - बार्शी - परांडा ते बीड - पैठण या प्राचीन नगराशी जोडणाऱ्या रस्त्यावर पाथरूड वसले आहे , अलीकडच्या काळातील परांडा बीड मार्ग पाथरूड वरून जातो ,पाथ म्हणजे रस्ता आणि रुड किंवा रूढ म्हणजे परंपरा म्हणजे या गावातून जाणार रस्ता रूढी परंपरे प्रमाणे हजारो वर्षांपासून सर्वांच्या परिचयाचा व वळणाचा म्हणून पाथरूड या नावा विषयी निश्चित तर्क करण्यास हरकत नसावी. फार प्राचीन काळातील इतिहास आज उपलब्ध नाही परंतु निजाम राजवटीतील रझाकार काळातील दोन घटना पाथरुडच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना म्हणून नोंद घ्याव्यात आशा आहेत .
1. बीडच्या फौजदाराला धडा शिकवला :- साधारणतः 1944 सालाची ही घटना असावी .याकूब अमीन नावाचा बीडचा फौजदार होता .त्याचा स्वतःचा विवाह आटोपून परांड्यातून बीड ला पाथरूड मार्गे जात होता.त्याने आपले वऱ्हाड आताच्या साईबाबा मंदिराच्या मार्गे म्हणजे पूर्वीच्या पानदी मार्गे रवाना करून तो गावात काही साथीदारांसह शिरला त्या काळी हनुमान मंदिरा जवळ गणपतराव पवार(रिटायर्ड जज श्री.बाबूराव पवारांचे वडील) यांचे किराणा दुकान होते.दुकानात गणपतराव नव्हते पण तेथे काम करणारे माणिक माळी दुकानात होते . फौजदार दुकानात शिरला व सिगारेटची मागणी केली .माणिक माळी यांनी एक सिगारेट दिली पण फौजदाराला याचा राग आला तो म्हणाला "एक सिगारेट देतोस काय?मला ओळखले नाहीस?" म्हणून माणिक माळी यांच्या दोन थोबाडीत मारल्या व त्यास शिवीगाळ करू लागला .फौजदाराच्या आवाजा मुळे अनेक गावकरी जमा झाले .गावकरी जमा झालेले पाहून फौजदार आणखीनच चेकाळून गावकऱ्यांना शिव्या देवू लागला . आंबू तेली(देशमाने) व अर्जुन बोराडे(दिलीप गौतम बोराडेचे चुलत आजोबा) हे धाडशी तरुण फौजदाराला जाब विचारायला पुढे आले .मस्तवाल फौजदाराने कमरेच्या म्यांनातून तलवार काढली व पहिल्यांदा अर्जुन बोराडे याच्या वर वार केला त्याच्या कपाळावर वर्मी घाव लागला सर्वांग रक्ताने माखले .त्यांच्या पाठोपाठ धावून आलेल्या आंबू तेल्याला खाली पाडून त्याच्या नरडीचा तलवार लावली.बलदंड आंबू तेल्याने तलवारीचे पाते धरले व धारदार पाते हाताने पिळले व फौजदाराची तलवार खाली पडली दोन्ही हात चांगलेच कापले पण नारड्यावरची तलवार बाजूला सारण्यात यश आले . मग मात्र गावकरी चिडले व त्यांनी फौजदाराला बेदम चोप दिला .तेवढ्यात गुमस्ता (पोलीस पाटलाचे सहकारी) धारप्पा वाणी हे येस्कर व रामोशा सह घटना स्थळी पोहचले .फौजदाराला गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले .फौजदार खूप चिडला होता गावकरीही संतप्त होते ,आजू बाजूच्या माळ वदावरून दगड आणि गोफण घेऊन बायका पोर सज्ज होती.वातावरण तापले होते फौजदाराला जिवंत सोडायच नाही असा पण गावकऱ्यांनी केला होता पण फरशी कुऱ्हाडी हातात घेतलेले रामोशी गावकाऱ्याला मागे हटवीत होते .धारप्पा गावकऱ्यांना शांत करीत होते . फौजदार रामोशी येस्कारांना शिव्या घालू लागला. तेवढ्यात भूम पोलीस स्टेशन मधून फौजदार व पोलीस कुमक पोहचली भूमच्या फौजदाराने सर्व वृतांत समजून घेतला व बीडच्या फौजदार व काही गावकऱ्यांना अटक करून परांड्याला घेऊन गेले त्याकाळी परांड्याला कोर्ट होते .त्या नंतर बरेच दिवस तारखा चालू होत्या अक्षरशः सारे गाव तारखेला हजर राहत असे कोर्टाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.पुढील कालखंडात या घटनेनंतर रझाकार काळात रझाकारही पाथरूड मध्ये शिरायला घाबरत.
पाथरुडच्या अत्याचारी रझाकार कोतवालाचा वध ही दुसरी घटना पुढील भागात . क्रमशः
-- हेमकांत अशोकराव महामुनी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा