नळदुर्ग फोर्ट – नळदुर्ग
नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदु धर्माच्या काही मंदिरांचा सुध्दा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे.
स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.आलीयाबाद चे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले.
सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे.
किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधार्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही.
खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही.
नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणार्या बंधार्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधार्यामध्ये चार मजले आहेत. बंधार्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे. बंधार्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधार्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत.
नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरूज, त्यावरील लांब तोफ, दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नळदूर्ग किल्ला - एक पर्यटन स्थळ

नळदुर्ग किल्ला दहावीच्या पुस्तकात
उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या ऐतिहासिक वारशाला आणखी एक कोंदण

मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या ऐतिहासिक वारशाला आणखी एक अभिमानास्पद कोंदण लाभले आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल या विषयासाठी नळदुर्ग किल्ल्याच्या माहितीवर आधारित पाठ तयार केला आहे. त्यामुळे नळदुर्ग किल्ल्याची माहिती महाराष्ट्रासह देशाच्या नकाशावर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नळदुर्ग किल्ल्याला इयत्ता १० वी च्या भूगोल विषयातील अभ्यासक्रमासाठी निवडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किल्ल्यांची माहिती आता शालेय स्तरावर वर्गात शिकवली जाणार आहे. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी देखील नळदुर्ग किल्ला अभ्यासक्रमात घेण्यात आला आहे. ही क्षेत्रभेट नळदुर्ग ते अलिबाग माग्रे सिंहगड अशी ठरविण्यात आली आहे. या पाठात ‘विद्यार्थी रहा हूं’ हा आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार या क्षेत्रभेटीची माहिती शिक्षकांकडून घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पाठात शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यातील संभाषण आणि या संभाषणाच्या माध्यमातून नळदुर्ग ते अलिबाग या नकाशाच्या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक पर्यटनविषयक नोंदींचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान मंडळाने नळदुर्ग भुईकोट किल्ला भूगोलाच्या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता दिलेली ही संधी नळदुर्ग आणि परिसराच्या ऐतिहासिक वारशाला नवीन कोंदण मिळवून देणारी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा