मुख्य सामग्रीवर वगळा

उस्मानाबाद जवळचे तेर गाव - ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे पण दुर्लक्षित ठिकाण

उस्मानाबाद जवळचे तेर गाव - ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे पण दुर्लक्षित ठिकाण




उस्मानाबाद जवळच्या तेर गावास नुकतीच भेट दिली. इ.स. पूर्व चारशे पासून वस्ती असलेली आणि इसवी सनाचे पहिले शतकते दुसरे –तिसरे शतक या काळात बहरलेली आणि नंतरही मध्ययुगापर्यंत महत्वाचे ठिकाण असणारी समृद्ध आणि सम्पन्न प्राचीन तगर नगरी. टॉलेमीने नोंद घेतलेल्या आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या प्राचीन ग्रंथात पैठणनंतरचे महत्वाचे व्यापारी शहर म्हणून उल्लेखलेल्या या गावात फिरण्याची संधीमिळाली. अनेक पांढरीची टेकाडे तेरणा नदीकाठी दिसतात ज्यांचे उत्खनन होणे बाकी आहे. जिथे उत्खनन झाले आहे ते नंतर झाकून ठेवलेले आहे. पण जरा आतल्या बाजूने फिरायला लागलो की प्राचीन खापरांच्या तुकड्याचे खचच्या खच दिसायला लागतात आणि आपण दोनेक हजार वर्षे मागे गेलो आहोत असा अद्भुत भास होउ लागतो. इ. स. चौथ्या ते पाचव्या शतकातले त्रिविक्रम मंदिर (या मन्दिराच्या कालनिश्चितीबद्दल वेगवेगळी मते दिसतात)सहाव्या शतकातले उत्तरेश्वर मंदिरत्याच काळातले कालेश्वर मंदिर या वास्तू बघण्यासारख्याआहेत.

                                                                          (त्रिविक्रम मन्दिर)


त्रिविक्रम मंदिर मूळचे विटांमध्ये बांधलेले आणि चैत्याच्या आकाराचे आहे. त्यामुळे ही वास्तू म्हणजे बौद्ध धर्मियांचा चैत्य होता असे म्हणतात. काही जणांनी हे पल्लव शैलीतले हिन्दू मंदिर असावे असेही म्हटले आहे.   

                                       (त्रिविक्रम मन्दिराचे चैत्य शैलीतले गजपृष्ठाकृती गर्भगृह)
             (त्रिविक्रम मन्दिराच्या मंडपाच्या छताच्या मध्यभागी असलेले प्राचिन लाकडी पुष्पवर्तुळ)

उत्तरेश्वर मंदिराचेही बांधकाम विटांचे आहे. विविध आकारातल्या आणि डिझाइनच्या विटा मनोहारी आहेत. विटांमधले कोरीव कामच जणू.  

 
                          (उत्तरेश्वर मन्दिर समोरच्या बाजूने)


                                                (शिखरावरील जुने विटकाम, उत्तरेश्वर मन्दिर)
                        (उत्तरेश्वर मन्दिराच्या प्रवेश्द्वाराची चौकट. सध्या ही म्युझियममध्ये ठेवलेली आहे)

तेर हे संत गोरोबा कुंभारांचेही गाव. संत गोरोबा कंभारांचे मंदिर कालेश्वर मंदिराशेजारी आहे.

                (गोरोबा काका कुंभार समाधी मन्दिर आणि कालेश्वर मन्दिराचे सामायिक प्रवेश्द्वार)


                                              (कालेश्वर मन्दिर बाजूने काढलेला फ़ोटो)
                    (कालेश्वर मन्दिराचे द्राविड पद्धतीचे शिखर जवळून)

टेराकोटापॉटरीविटा इत्यादि मातीकामातल्या इतक्या सुंदर कलाकृती असणारया गावात पूर्वी कुंभारांची मोठी वस्ती असणेही स्वाभाविक. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील गावे (मच्छलीपट्टणम) ते पैठणमार्गे भडोच या सातवाहनकालीन व्यापारी महामार्गावरचे तगर उर्फ तेर हे महत्वाचे शहर होते.(काही विद्वानांच्या मते प्राचीन तगर म्हणजे जुन्नर तर काहीजण कोल्हापूर असेही म्हणतात. पण एकुणात तेर गाव हे जास्त प्रबळ दावेदार समजले जाते)

रामलिंगण्णा लामतुरे या गावकर्‍याने स्वत:च्या हौसेपोटी तेर परिसरात सापडणारया शेकडो प्राचीन वस्तूंचा संग्रह केला. त्यांचा खाजगी संग्रह त्यांनी नंतर सरकारला सुपूर्त केला. हेसंग्रहालय पाहण्यासारखे आहे. 

                                                                       (फोटो: इंटरनेटवरुन)
या संग्रहालयातही सुधारणा करायला भरपूर वाव आहे. आता इथे साधे ब्रॉशरसुद्धा उपलब्ध नाहीय. संग्रहालयातल्या प्राचीनरोमन व्यापाराच्या अनेक खुणा बाळगणारया विविध वस्तू मात्र आवर्जून बघाव्यात अशा आहेत. वस्तून्मधले वैविध्य वाखाणण्याजोगे आहे. अत्यंत बारीक कलाकुसर असलेले लाइमस्टोनमधले बारके साचेउत्कृष्ठ दर्जाचे टेराकोटा आर्टिफॅक्ट्स (मद्याच्या सुरयाछोटे दिवेइत्यादी)सातवाहनकालीन नाणीलज्जागौरीची अनेक सुंदर सुंदर टेराकोटा आणि दगडातली शिल्पे (रा. चिं. ढेरे यांच्या मतेलज्जा गौरी ही प्राचीन काळातली fertility शी संबंधित उपास्यदेवता होती)जैन तीर्थंकरांच्या सुंदर मुर्तीप्राचीन बौद्ध स्तुपाचे दगडी अवशेषउत्तरेश्वर मंदिरातल्या दरवाजाची अपूर्व असे कोरीव काम असलेली लाकडी चौकट अशा नाना सुंदर वस्तू इथे आहेत.

लज्जागौरीच्या अनेक छोट्या टेराकोटाच्या मुर्ती तेरच्या म्युझियममध्ये सापडतात. डॉ. ह. धी. सांकलिया यांच्या मते ही मूळची विदेशी देवता इजिप्तमधून रोमन संपर्काच्या काळात, ख्रिस्तोत्तर पहिल्या एक दोन शतकात भारतात आली. शहरी व्यापाराचा परिणाम म्हणून धार्मिक, सांस्क्रुतिक कल्पना, श्रद्धा यांचेही आदानप्रदान होणे स्वाभाविक असते. भारतातल्या मूळच्या सुप्रजननाविषयीच्या धार्मिक समजुती आणि देवकल्पनेवर ह्या व्यापाराच्या परिणामातून आलेल्या नव्या देवताआकाराचे आरोपण होउन लज्जागौरी हा प्रकार सुरु झाला असावा असे म्हणतात. त्यामुळेच या देवतामुर्ती मुख्यत: पश्चिम आणि दक्षिण भारतात (peninsular india) खासकरुन सातवाहन कालीन व्यापारी मार्गावरील ठिकाणांमध्ये सापडतात.

इतक्या सगळ्या अपूर्व अशा प्राचीन इतिहासाची साक्ष देणार्‍या गोष्टी असूनही तेर गावाची एक पर्यटन स्थळ म्ह्णून असलेली स्थिती दयनीय आहे. माहिती सांगणार्‍या गाइडची व्यवस्था नाही, गावात फ़िरताना मंदिरांची, महत्वाच्या वास्तूंची दिशा दाखवणारे फलक नाहीत., म्युझियममध्ये माहितीपर पुस्तिका नाहीत, गावकर्‍यांना इथल्या ऐतिहासिक वारशाबद्दल ममत्व नाही. तेर गाव जर युरोपात असते तर त्याचे किती कौडकौतुक झाले असते. किती देखणे म्युझियम गावात उभे राहिले असते किती सोयीसुविधा असत्या आणि जगभरचे पर्यटक आकर्षित झाले असते. आपल्याइथली डिफॅक्टो व्यवस्था अजूनही सरंजामी सत्राप पद्धतीचीच आहे. म्हणजे राज्य/प्रदेश पातळीवरचा एक म्होरक्या (उदा. साहेब वगैरे) आणि मग उपप्रदेश पातळीवरचे आणि खाली जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर. ह्यांच्यापैकी कुणालाही ऐतिहासिक दृष्टी किंवा टुरिझमच्या अंगाने व्हिजन असण्याची शक्यता नाहीय. आणि या दांडगटांना वगळून काही करता येणे कठीण आहे. शिवाय वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सध्ये समन्वयाचा अनुभव असतो. ASI  बद्दल तर न बोललेलेच बरे. तेरमध्ये त्रिविक्रम मंदिराचे रिस्टोरेशन करताना विटकामाच्या भिंतींवरून बाहेरुन चुन्याच्या भिंती उभ्या केल्या आहेत. त्यामुळे या वास्तूचे अतिशय शोचनीय विदृपीकरण झाले आहे. अशीच परिस्थेती कालेश्वर मंदिराची आहे.

आपल्या इथे ऐतिहासिक दृष्टीचा दुष्काळ आहे. धार्मिकसांस्कृतिक क्षेत्रातले मेनस्ट्रीम मधले धुरीण अजूनही मध्ययुगीन दृष्टी बाळगुन आहेत तर बहुजन मंडळी गेल्या काही शतकात सापडलेल्या नव्या आयकॉन्सचे दैवतीकरण करण्यात मग्न आहेत. अशात मग आपल्या सम्पूर्ण प्रदेशाचा जवळपासतीनचार शतके सुवर्णकाळ असलेल्या सातवाहन काळाबद्दल सर्वांनी मिळून आत्मीयता आणि अभिमान बाळगणे तर फारच दुरापस्त गोष्ट झाली. सातवाहन काळ ही एकमेव राजवट अशी आहे की जिचे अवशेष महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये (खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण) सापडतात. शिवाय या लोकांचे मूळ महाराष्ट्रात होते आणि हल्ली मराठी भाषेचे मूळही या राजवटीच्या काळात शोधले जाते आहे.

अशा वेळी टर्कीसारख्या इस्लामी देशातजिथे कित्येक शतकेइस्लामी साम्राज्याचे गंडस्थळ होतेतिथे पुरातत्वशास्त्रास भरपूर महत्व देउन आपल्या कारकीर्दीत सम्पूर्ण तुर्कस्तानात उत्खननाची मोहीम हाती घेणारया केमाल पाशाची आठवण होते. हल्ली इस्लामिक नेते सातव्या शतकाच्या मागे सहसाजाउ धजत नाहीत. पण केमाल पाशाने उत्खननातुन उजागर झालेला टर्कीचा इ. स. पूर्व सहाव्या सहस्त्रकापासूनचा इतिहास वंदनीय मानला. उत्खननात सापडलेल्या तिसरया सहस्त्रकातल्या ब्रॉंझच्या काळविटाच्या शिंगासारख्या सुंदरमोटिफच्या शिल्पाकृतीची अंकाराच्या प्रमुख चौकात त्याने उभी केलेली प्रचंड मोठी प्रतिकृती बघण्यासारखी आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्या इथे या विषयाची होणारी परवडपराकोटीची आहे. तेरमध्येच अडुसष्ठ साली केलेल्या उत्खननात प्राचीन बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. सव्वीस मीटर व्यास असलेला हा स्तुप अद्वितीय होता (सांची स्तुपाचा व्यास 36 मीटर). स्तुपाची बांधणी एका मोठ्या चक्रात दुसरे लहान चक्र अशी होती. दुर्दैवाने या अवशेषांचा आता ठावठिकाणाहीराहिलेला नाही. हा भाग आता नांगरटीखाली आहे. अवशेषांचे फोटोच फक्त आहेत. आणि हळहळ. तेरमध्ये काही नदीकाठच्या पांढरीच्या टेकाडांवर (archeological mounds) सध्या वस्ती आहे. या टेकाडांच्या नदीकडेच्या बाजूला जवळपास दहा पंध्रा फुट खोलीचे उभे छेद बघायला मिळतात. यात जुन्या वस्तींचे थरवेगवेगळी खापरेइ. बघायला मिळतात. 



                            (पांढर्‍या टेकाडाची नदीकडेची बाजू)



          (पांढर्‍या टेकाडाचा नदीकडेचा छेद जवळून. खापरांचे थर दिसताहेत)

मी अशा एका टेकाडाच्या नदीकडेच्या भागात फिरलो. हा परिसर म्हणजे अक्षरश: हागणदारी होती. फिरताना जमीनीवरची स्वच्छ भारत रांगोळी तुडवली तर जाणार नाही ना याची काळजी घ्यावी लागत होती. असा एकूण आनंदी आनंद आहे...

तेर सोलापुराहून नव्वदेक किलोमीटर अंतरावर आहे. उस्मानाबादहून पंचविसेक किलोमीटर. म्युझियममधल्या कर्मचार्‍यांकडून नीट माहिती घेतल्यासच गावातल्या इतर स्थळांना भेट देता येते. मी फ़िरत असताना इथल्या कर्मचार्‍याची मला खूप मदत झाली.

(संदर्भ: तेर, शां. भा. देव, प्रकाशक - पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग, सातवाहनकालीन महाराष्ट्र, रा. श्री. मोरवंचीकर, लज्जागौरी, रा. चि. ढेरे, The history and inscriptions of the Satavahanas and the Western Kshatrapas by V. V. Mirashi)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून?

उस्मानाबाद की धाराशीव? या शहराचं नाव आलं कुठून? प्रणाली येंगडे बीबीसी मराठीसाठी 17 जानेवारी 2021 अपडेटेड 18 जानेवारी 2021 फोटो स्रोत, GETTY IMAGES फोटो कॅप्शन, मीर उस्मान अली खान मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून उस्मानाबादचा "धाराशीव" असा उल्लेख झाल्यानं नामांतराचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. अशावेळी या शहराच्या नावाचा इतिहास आणि त्यामागील राजकारण याविषयी घेतलेला हा संक्षिप्त आढावा. धाराशीव  नावाचा इतिहास धाराशीव या उस्मानाबादच्या पूर्वीच्या नावाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव 'धारासुरमर्दिनी' झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. औरंगाबादचं नाव आजवर कितीवेळा बदललंय हे तुम्हाला माहिती आहे का? औरंगाब...

अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा

नजरिया Home इतिहास अंबाजोगाईत निजाम सरकारच्या खाणाखुणा   Sep 16, 2018 अं बाजोगाई शहराला तसे फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी हा भाग निजाम संस्थानात असलेल्या हैदराबाद संस्थानात यायचा. त्यावेळी मराठवाडा विभागाला  ‘ मराठवाडी ’  असं  म्हटलं जायचं. हैदराबाद संस्थान काळात अंबाजोगाई शहराला जिल्हयाचा दर्जा होता.  सन १८६०-१९०० या चाळीस वर्षांच्या काळात या शहरात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी अनेक देखण्या वास्तू शंभरी पार करुन आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक जुन्या वास्तूंच्या ठिकाणी त्याच कार्यालयाच्या नव्या देखण्या इमारती उभ्या आहेत.  मराठवाडा विभागातील जवळपास सर्वच गावात हे चित्र आहे. मात्र ,  अंबाजोगाई त्याकाळी जिल्हा व निजाम सरकारच्या सैन्यदलाचं मुख्य केंद्र होतं. या शहारात निजाम राजवटीतील अनेक वास्तू ,  समाध्या ,  मंदीरे ,  मस्जिद ,  ख्रिश्चन स्मशानभूमी ,  सैन्यदलाची बंकरे अशा अनेक खुणा मराठवाडा मुक्ती संग्रामापूर्वीची साक्ष देत उभ्या आहेत. या ऐतिहासिक वास्तुंचे जतन होण्याची गरज आहे. अंबाजोगाई शहरावर आणि हैदर...

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी केदारेश्वर मंदिर  हे  महाराष्ट्रातील   बीड जिल्ह्यातील   धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन  शिवमंदिर  आहे. याचे स्थापत्य  चालुक्य शैलीत  केले आहे. आरंभ  मराठवाडा  परिसर प्राचीन  शिल्प स्थापत्य  अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत.  सातवाहनांपासून   यादव  काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या. मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले. प्रतिष्ठाननगरी  ही त्यांची राजधानी होती.  वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष  वाकाटकांनी  राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे व...