पोतराज
‘मरिआई’ या ग्रामदेवतेचा उपासक.
पोतराज हा शब्द म्हणजे ‘पोत्तुराजू’ या तमिळ शब्दाचे रूपांतर होय.
शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो.
दक्षिणेत ‘सात बहिणी’ या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्ध आहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला ‘पोत्तुराजू’ म्हणतात.
मरिआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला ‘मरिआईवाला’ व ‘लक्ष्मीआईवाला’ अशीही नावे आहेत.
पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा ‘कडकलक्ष्मी’ आली असे म्हटले जाते. मरिआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात.
पोतराजाच्या हातातील कोरडय़ाला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला ‘कडकलक्ष्मी’ हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे.
लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.
पोतराज पुरुष असूनही तो बहुतांशी स्त्रीवेषात असतो. त्याच्या कंबरेभोवती असलेला हिरव्या खणांचा घागरा हा लिंबाचा पाला नेसण्याच्या प्रथेचा अवशेष असण्याची शक्यता आहे. त्याच्या कंबरेच्या वरचा भाग उघडा असतो, दाढी राखलेली नसते, पण मिशा मात्र असतात. त्याने स्त्रियांप्रमाणे वाढविलेल्या केसांचा बहुदा अंबाडा बांधलेला असतो व कपाळावर हळद व कुंकू यांचा मळवट असतो. डोक्यावर मरिआईचा देव्हारा व हातात मोरपिसांचा कुंचा घेतलेली त्याची पत्नीही त्याच्याबरोबर असते.
पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी गावात येतो, तेव्हा डफडे व क्वचित ढोलके वाजवत असतो. गावात मरिआईचा फेरा आल्याची घोषणा तो करतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत तो नाचतो, तेव्हा त्याची पत्नीही नाचत असते.
तो ‘आलीया मरिबाई’, ‘बया! दार उघड’ ही गीते म्हणतो. ओवी छंदातील या गीतांतून प्रामुख्याने मरिआई, लक्ष्मीआई, कोल्हापूर इत्यादींचे महात्म्य असते.
एकनाथांचे ‘बया! दार उघड’ हे प्रसिद्ध भारूड पोतराजाच्या भूमिकेतून लिहिलेले आहे.
मरिआईच्या देव्हा-याचे दार उघडावे आणि तिने प्रसन्न व्हावे, यासाठी पोतराज आत्मपीडनाचा मार्ग पत्करतो.
नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभोवती मारणे, दंडाला दोरी बांधून दंडात दाभण खुपसणे, दातांनी स्वत:च्या मनगटाचा चावा घेणे इत्यादी प्रकारे तो आत्मक्लेश करून घेतो. त्यानंतर देव्हा-याचे दार उघडते. मग त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात.
पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते. महाराष्ट्रातील पोतराजांपेक्षा दक्षिणेतील पोतराज अधिक उग्र असतात, असे दिसते. मरिआईच्या कोपाने पटकी, देवी इत्यादी साथी येतात आणि पोतराजाने तिला प्रसन्न केले की, त्या नाहीशा होतात, अशी लोकांची समजूत असते. प्रत्येक गावात पोतराज नसतो; परंतु पटकीची साथ आली असता मरिआईचा गाडा बाहेर नेण्यासाठी त्याला बोलावले जाते. या विधीचे पौरोहित्य तोच करतो. गाडय़ावर देवीची मूर्ती ठेवून गाडा गावाच्या वेशीबाहेर नेला जातो आणि तो नेताना देवीने पुन्हा कोणीकडूनही गावात येऊ नये, यासाठी पोतराज सगळीकडून ‘गाव बांधण्या’चा एक विधी करतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा