औरंगाबाद
इतिहासकाळातील प्रतिष्ठान, भोगवर्धन, देवगिरीपाठोपाठ चारेकशे वर्षांपूर्वी लहानशा खडकी गावाचे औरंगाबाद झाले. शहरालगत असलेली अजिंठा आणि वेरूळ ही जागतिक वारसा स्थळे, शिवाय देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा या राष्ट्रीय स्मारकांबरोबरच मराठवाड्यात शेकडो प्राचीन मंदिरे, कित्येक बुलंद किल्ले, महाल, नहरी, अशा पाऊलखुणा उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. मात्र आता विकासकामे करताना आड आलेल्या ऐतिहासिक अवशेषांचा सरसकट बळी देण्याची घातक प्रथा या शहरात रुजली आहे. तीन-चारशे वर्षांपूर्वीची बांधकामे धडाधड पाडली जात आहेत. अद्वितीय अशा नहरींचे जागोजागी केवळ अवशेष उरले आहेत.
बुऱ्हाणी नॅशनल स्कूलची चुनेगच्ची इमारत गेली. चिमणाराजाची हवेली पाडली. जुनाबाजारातील जुनाखानची सरायही आता नामशेष झाली. सर्वांच्या डोळ्यांदेखत क्रांती चौकातील काळा चबुतरा, दमडी महाल, खासगेट शहीद झाले.. भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यासाठी आतापर्यंत कंत्राटदाराने खाम नदीवरील बारापुल्ला, शाहनूरवाडीच्या शिरापुरी नाल्यावरील पूल आणि फाजलपुरा येथील ऐतिहासिक पुलाचा बळी घेतला. काही दिवसांपूर्वी हिमायतबागेतील निजामकालीन धरणाची भिंत फोडून, बागेची तटबंदी तोडून गटाराचे पाईप काढले. नहर फोडली.
औरंगाबादचा ऐतिहासिक वारसा जगापुढे आणण्याचा "उदात्त' हेतू ठेवून कधीमधी होणारा वेरूळ-अजिंठा महोत्सव, मोजक्या अधिकाऱ्यांचा हेरिटेज वॉक, रिकाम्याच फिरणाऱ्या पर्यटन बस, अशा वरवरच्या उद्योगांमुळे या ऐतिहासिक शहराच्या पाऊलखुणा मिटत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा